Last Update:
 
गोवा

पणजी बाजारातील गाळेधारकांना आज नोटीस
सकाळ वृत्तसेवा
Thursday, June 03, 2010 AT 05:50 PM (IST)
Tags: Gao
पणजी, ता. १ (प्रतिनिधी) ः पणजी बाजार इमारतीच्या पहिल्या मजल्यावर बंद असलेल्या गाळ्यांची महापालिकेने आता दखल घेतली असून १०० हून अधिक गाळ्यांच्या मालकांना उद्या बुधवारी नोटिसा देण्यात येणार आहेत.
बाजार इमारतीच्या पहिल्या मजल्यावर हे गाळे आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते बंद अवस्थेत आहेत.
पहिल्या मजल्यावर ग्राहक फिरकत नसल्याने काही दुकानदारांनी गाळे बंद ठेवले असून काहींनी ते दुसऱ्यांना चालवायला दिले आहेत. अशा गाळ्यांची पालिकेने यादी तयार केली असून त्याचे खरे मालक कोण? याची माहिती घेण्यासाठी गाळेधारकांना नोटिसा देण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेचे आयुक्त एल्विस गोम्स यांनी दिली.
पहिल्या मजल्यावरील गाळ्यांचे वाटप व्यवस्थित झालेले नसून काहीजणांनी बेकायदा गाळ्यांचा ताबा घेतला आहे. त्यासाठी गाळेधारकांना योग्य ती कागदपत्रे सादर करून गाळा आपल्याच असल्याचे सिद्ध करावे लागणार आहे; अन्यथा त्या गाळ्यांचे नव्याने वाटप करण्यात येणार आहे. तसेच काही गाळ्यांचा ताबा दुकानदारांनी कोणत्या आधारावर घेतला आहे, याचीही चौकशी केली जाणार आहे, असे गोम्स यांनी सांगितले.
..........
पालिकेचा महसूल ३८ लाखांवर..
गेल्या सात वर्षांपासून बाजारातील गाळेधारकांकडून पालिकेला कसलेही भाडे मिळालेले नसून सध्या त्यांच्याकडून भाडे घेण्याचे काम सुरू झाले आहे. १९५ रुपये प्रती चौरस मीटर याप्रमाणे भाडे आकारण्यात येत आहे. गेल्या वर्षी ५ लाख रुपये महसूल पालिकेकडे जमा झाला होता. पण आता सोपो कर, पे पार्किंगमधून यावर्षी पालिकेला ३८ लाख रुपये महसूल मिळणार असल्याची माहिती एल्विस गोम्स यांनी दिली.


 
 
About Us | Contact Us | Privacy Policy | Ad Rate Card
© Copyrights 2010 DainikGomantak.com - All rights reserved.
of
Powered By: