इस्राईलच्या हल्ल्याच्या निष्पक्ष चौकशीची मागणी
सकाळ वृत्तसेवा
Thursday, June 03, 2010 AT 05:51 PM (IST)
न्यूयॉर्क/जेरुसलेम, ता. १ ः गाझापट्टीतील नागरिकांना मदत घेऊन जाणाऱ्या जहाजांच्या ताफ्यावर इस्राईलने केलेल्या हल्ल्याची निष्पक्षपणे चौकशी करण्याची मागणी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीने मंगळवारी केली आहे.
या हल्ल्यात नऊ जण मारले गेल्याचे आज अधिकृतपणे सांगण्यात आले. दरम्यान, मदत घेऊन जाणाऱ्या जहाजावरील स्वयंसेवी संस्थांच्या कार्यकर्त्यांना सोडून दिल्याचे वृत्त आहे. जगभरातून टीका झाल्यानंतर बाजू सावरून घेण्याचा प्रयत्न इस्राईल सरकार एकीकडे करत असताना दुसरीकडे त्यांच्या नौदलाने पुन्हा मदतीसाठी जहाज पाठविले तर तेही अडविण्यात येईल, असे म्हटले आहे.
गाझा पट्टीतील नागरिकांना मदत घेऊन जाणाऱ्या जहाजावर हल्ल्याचा निषेध सुरक्षा समितीने केला आहे. या हल्ल्यानंतर गेल्या तीन वर्षांपासून पॅलेस्टाईनवर लादण्यात आलेले निर्बंध उठविण्याची मागणी करण्यात येत आहे.
या विषयावर संयुक्त राष्ट्रांमध्ये आज सखोल चर्चा झाली. तसेच अमेरिका आणि तुर्कस्तान यांच्यातही स्वतंत्रपणे चर्चा झाली. त्यानंतर संयुक्त राष्ट्रांतर्फे चौकशीची मागणी करणारे निवेदन जारी करण्यात आले. काल इस्राईलच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांत तुर्कस्तानच्या नागरिकांचाही समावेश आहे. कारण, मदत घेऊन जाण्याचे काम तुर्कस्तानातील स्वयंसेवी संस्था करत होती.