Last Update:
 
गोमंतक विशेष

विरोधकांचाही मित्र!
सकाळ वृत्तसेवा
Thursday, June 03, 2010 AT 04:43 PM (IST)
Tags: Special
... तेव्हाच मला समजले की भाऊसाहेब हे एक अजब रसायन आहे. पंधरा मिनिटांपूर्वीच एकमेकांबरोबर संघर्ष झालेल्या दोन व्यक्‍ती आता एकत्रपणे मासेमारी करीत होत्या. माझ्यासाठी हा अनुभव नवीन होता. राजकारणात संघर्ष असतो, परंतु या संघर्षाला व्यक्‍तिगत विद्वेषाची झालर असता कामा नये, ही बाब भाऊसाहेबांनीच माझ्या मनावर कोरली. आजही ही गोष्ट चिरकालीन माझ्या स्मरणात आहे व याचे श्रेय कोणतीही कमीपणा न बाळगता भाऊसाहेबांना मी देतो.
माझ्या राजकीय कालखंडात ज्या व्यक्‍तिमत्त्वांचा माझ्या व्यक्‍तिगत व राजकीय जीवनावर प्रभाव पडला त्यात भाऊसाहेबांचा समावेश आहे. फार पूर्वीपासून मी गोव्यात येत आहे. आम्हा लोकांचे वय वाढत गेले तसतसे या प्रदेशातील बदलही आम्हाला जाणवतात. सर्वप्रथम मी गोव्यात केव्हा आलो, तेव्हा येथील स्थिती कशी होती, यासंबंधीच्या स्मृती माझ्या मनात जागृत होत आहेत...
१९६१ साली गोवा स्वतंत्र झाला. गोवामुक्‍तीनंतर येथे जेव्हा पहिली निवडणूक झाली तेव्हाच महाराष्ट्रातील नेतृत्वाने आम्हा तरुणांवर येथील निवडणुकीत सहभागी होण्याचा संदेश दिला होता. सावंतवाडीच्या परिसरात पोचताच गोव्यातील राजकीय परिस्थितीचा अंदाज आम्ही घेत होतो. कॉंग्रेसचा प्रचार करण्यासाठी आम्ही गोव्यात आलेलो असलो तरी नेतृत्वाचा आदेश विचित्र होता. रात्री भाऊसाहेबांचे कार्य व त्यांची भूमिका मांडायची व दिवसा पुरुषोत्तम काकोडकर यांच्या कार्यालयात हजेरी लावायची. पेडणे व आसपासच्या परिसरात या आदेशाचे आम्ही पालन केले.
यानंतर भाऊसाहेब बांदोडकर मुख्यमंत्री असताना राज्य विधानसभेत बसण्याचीही संधी मला मिळाली. विरोधकांशी असलेले मतभेद जपत राजकारण व समाजकारण कसे करायचे, याचा आदर्श मला गोव्यातच मिळाला. मला आठवतं एक दिवस मला गोवा विधानसभेत जाण्याची संधी मिळाली. सचिवालयात मी भाऊसाहेबांची भेट घेतली. विधानसभेतून मी उठलो की तूही उठायचे असे त्यांनी मला बजावले होते. तेव्हा युगोचे जॅक सिक्वेरा हे विरोधी पक्षनेते होते. मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर व विरोधी पक्षनेते जॅक सिक्वेरा यांच्यात विधानसभेत जोरदार संघर्ष झाला. जॅक सिक्वेरा यांनी भाऊसाहेबांच्या नेमकी उलटी भूमिका विधानसभेत मांडली. काही वेळाने भाऊसाहेब विधानसभेतून उठले, मीही उठलो. माझ्या लक्षात आले की त्यांनी जॅक सिक्वेरानाही उठण्याची खूण केली. भाऊसाहेबांनी मला व जॅक सिक्वेरांना आपल्या मोटारीत बसविले व आम्हाला दोना पावल येथील समुद्रकिनाऱ्यापाशी नेले. तेथे भाऊसाहेब व जॅक सिक्वेरा एकत्र बसून मासेमारी करू लागले. तेव्हाच मला समजले की भाऊसाहेब हे एक अजब रसायन आहे. पंधरा मिनिटांपूर्वीच एकमेकांबरोबर संघर्ष झालेल्या दोन व्यक्‍ती आता एकत्रपणे मासेमारी करीत होत्या. माझ्यासाठी हा अनुभव नवीन होता. राजकारणात संघर्ष असतो, परंतु या संघर्षाला व्यक्‍तिगत विद्वेषाची झालर असता कामा नये, ही बाब भाऊसाहेबांनीच माझ्या मनावर कोरली. आजही ही गोष्ट चिरकालीन माझ्या स्मरणात आहे व याचे श्रेय कोणतीही कमीपणा न बाळगता भाऊसाहेबांना मी देतो.
भाऊसाहेब एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व होते. या उत्तुंग व्यक्‍तिमत्त्वाच्या घरात शशिकलाताईंचा जन्म झाला. त्यानंतर माझा महाराष्ट्राच्या विधानसभेत प्रवेश झाला. भाऊसाहेबांचे मंत्रिमंडळही सर्वसमावेशक होते. वि. सु. करमली मंत्री होते. शिवाय टोनी डिसोझा हे दुसरे मंत्री होते. यामुळे भाऊसाहेब मंत्रिमंडळामार्फतही सामाजिक समतोल साधण्याचा प्रयत्न करत होते. त्यानंतर राजकारणात राणे आले. ताईही आल्या. ताईंकडे बहुधा शिक्षण खातेच होते. अशा परिस्थितीत भाऊसाहेबांचे अचानक निधन झाल्याचे वृत्त मला समजले. त्यांना हृदयविकाराचा झटका आलेला होता. मुंबईतूनही डॉक्‍टर आणण्याचे प्रयत्न सुरू होते. परंतु डॉक्‍टर काही पोचू शकले नाहीत.
पित्याला अग्नी देताच राज्याच्या नेतृत्वाची जबाबदारी ताईंकडे आली. पित्याला अथवा मातेच्या चितेला अग्नी दिल्यानंतर राज्याचे अथवा देशाचे नेतृत्व करण्याचे प्रसंग भारतात दोन व्यक्‍तींवर आले. यातील पहिल्या ताई तर दुसरे राजीव गांधी. भाऊसाहेब बांदोडकर व शशिकलाताई यांचा मुख्यमंत्रिपदाचा कालखंड हा गोव्याच्या स्थैर्याचा व विकासाचा कालखंड होता.
(माजी मुख्यमंत्री शशिकलाताई काकोडकर यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिनाच्या निमित्ताने आयोजित सत्कार सोहळ्यात केलेल्या भाषणातून)


 
 
About Us | Contact Us | Privacy Policy | Ad Rate Card
© Copyrights 2010 DainikGomantak.com - All rights reserved.
of
Powered By: