Last Update:
 
संपादकीय

देणारं झाड
सकाळ वृत्तसेवा
Thursday, June 03, 2010 AT 05:11 PM (IST)
Tags: Editorial
ग. प्र. प्रधान यांच्या निधनाने निरलस व ध्येयवादी वृत्तीने सार्वजनिक जीवनात काम केलेल्या पिढीचा एक दुवाच निखळला आहे. समाजातील दलित, पीडित आणि उपेक्षितांच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करण्यासाठीच राजकारण करायचे, यावर दृढ श्रद्धा असलेला माणूस आपल्यातून गेला आहे.
ऐन तारुण्यात त्यांनी आपल्या ध्येयपूर्तीसाठी झपाटून काम केलेच; परंतु वानप्रस्थाश्रम स्वीकारल्यानंतरही सतत देत राहण्याची त्यांची असोशी कमी झाली नव्हती. एवढेच नव्हे, तर मृत्यूनंतरही देहदानाच्या रूपाने त्यांनी देत राहण्याचा वसा जपला. आपल्या मृत्यूनंतर स्मारक न करता एखादे झाड लावावे, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. वास्तविक त्यांचे सारे आयुष्य म्हणजेच इतरांना भरभरून देण्यासाठी उत्सुक असलेल्या झाडासारखे होते. आपल्या सावलीचा परीघ सर्वदूर पसरावा, या विचाराने झपाटलेले. फर्ग्युसनमधील प्राध्यापकी असो, राष्ट्रसेवा दलातील बौद्धिके असोत, मित्र-कार्यकर्त्यांशी केलेल्या गप्पा असोत; किंवा आमदार म्हणून लोकांशी साधलेला संवाद असो; प्रत्येक ठिकाणी आपल्याला जे ठाऊक आहे, ते इतरांना तळमळीने समजावून सांगण्याचा त्यांचा प्रयत्न असे. "महाराष्ट्राचे मास्तर' ही त्यांना मिळालेली उपाधी अगदी सार्थ होती. इतरांना भरभरून देण्याची ही त्यांची वृत्ती हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा भागच होता; परंतु हे केवळ वैयक्तिक दातृत्व नव्हते. त्याला एका व्यापक वैचारिक ध्येयवादाचे कोंदण होते. मुळात विसाव्या शतकाचा पूवार्ध हा मंतरलेला कालखंड होता. त्याआधीच्या काही वर्षांत न्या. रानडे यांनी ऊब दिलेला महाराष्ट्राचा थंड गोळा आता सर्वांगांनी बहरू लागला होता. स्वातंत्र्याच्या संघर्षाने तो तापू लागला होताच; परंतु राजकीय-आर्थिक विचार, समाजसुधारणा, ललित कला, साहित्य-संस्कृती अशा सर्वच क्षेत्रांत एक उत्थान आकाराला येत होते. प्रधान मास्तरांचे सारे आयुष्य पाहिले की या प्रबोधनपर्वाचे ते एक सुंदर अपत्य होते, असे लक्षात येते. त्या काळातील सर्जनशीलता, उत्कट ध्येयवाद आणि त्यागभावना हे सगळे प्रधानांनी अक्षरशः टिपून घेतले होते.आपल्या व्यक्तिमत्त्वात मुरविले होते. टिळक आणि आगरक
र, गांधी आणि नेहरू, फुले आणि आंबेडकर, महर्षी शिंदे आणि साने गुरुजी, टागोर आणि टॉलस्टॉय अशी त्यांची अनेक प्रेरणास्थाने होती. चिकित्सक वृत्ती न सोडताही आदर्शांची अशी श्रीमंती राखता येते, हे प्रधानांनी दाखवून दिले. विधान परिषदेत आमदार आणि विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी केलेले काम हा लोकाभिमुख संसदीय राजकारणाचा एक वस्तुपाठच होता. या माध्यमातून कितीतरी प्रश्‍न त्यांनी तडीस नेले. पूर्ण वेळ समाजकार्यात पडायचे, असे ठरविल्यानंतर फर्ग्युसनमधील प्राध्यापक पदाच्या नोकरीवर त्यांनी पाणी सोडले. आमदारकी सुरू राहण्याची शक्‍यता असूनही त्यांनी ती संधी नाकारली आणि साने गुरुजींना दिलेला शब्द पाळण्यासाठी "साधना'चे संपादकपद स्वीकारले. पत्नीच्या निधनानंतर आपले राहते घर साधना ट्रस्टला देऊन ते मोकळे झाले. स्वातंत्र्य लढ्याच्या काळात तुरूंगवासही अगदी सहजपणे पत्करला.
एरवी राजकारणाच्या धकाधकीत माणसे पार बदलून जातात, त्यांचे रंग पालटतात आणि निष्ठाही. सत्ता हेच साध्य बनून जाते; परंतु प्रधानांचा ध्येयवाद कधीच डागाळला नाही. अनेक महत्त्वाच्या भूमिका त्यांच्या वाट्याला आल्या. त्यामागे त्यांचे कर्तृत्व होते; परंतु हे "मोठेपण' निभावतानाही त्यांच्यातले "धडपडणारे मूल' कधी हरविले नाही. प्रधान मास्तरांनी ते अगदी सहजपणे टिकविले होते. त्यांचा निर्मळ साधेपणा, त्यांचे निर्व्याज हसणे आणि अंतर्बाह्य पारदर्शीपणा हा त्यातूनच आला असावा. उराशी बाळगलेल्या लोकशाही समाजवादाचे ध्येय पराभूत होणार की काय, अशी शंका येणारे प्रसंग अनेकदा त्यांच्या आयुष्यात आले. समाजवादी पक्षाच्या अनेकदा चिरफाळ्या उडाल्या, सोव्हिएत संघराज्याची पडझड झाल्यानंतर "समाजवाद' हा शब्दच काही काळ चेष्टेचा बनला; १९९१ मध्ये तर भारताने उदारीकरण-खासगीकरणाचा मार्ग अधिकृतरीत्याच स्वीकारला; परंतु या सर्व उलथापालथींचे साक्षीदार असलेल्या प्रधानांना ना कधी वैफल्याने ग्रासले, ना त्यांनी हातातील वल्हे टाकून दिली. निराशेचे मळभ परतवून लावण्याची ही शक्ती हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे एक लोभस रूप होते. त्यांच्याकडे कोणीही अगदी सहजपणे जाऊ शके. त्यांच्या सहवासात टवटवीत होऊन तो माणूस पुन्हा आपल्या कामाला लागे. पक्षीय राजकारणाच्या माध्यमातून समाजवादाचे ध्येय दृष्टिपथात नसूनही प्रधान मास्तर हताश झाले नाहीत. तेवढ्याच उत्कटतेने ते वेगवेगळ्या चळवळींच्या पाठीशी उभे राहिले. मग ती धरणग्रस्तांची चळवळ असो, शेतकरी-कष्टकऱ्यांची असो, किंवा स्त्रियांची चळवळ असो. त्यांचे हे रूप म्हणजे लोकशाही समाजवादावर निष्ठा असलेल्या हजारो कार्यकर्त्यांना एक दिलासा होता. या कार्यकर्त्यांविषयीच नव्हे, तर वेगवेगळ्या विचारसरणींच्या प्रकाशात देशाच्या उन्नतीची स्वप्ने पाहणाऱ
्या सर्वच कार्यकर्त्यांविषयी प्रधानांना प्रचंड आस्था होती. "साता उत्तराची कहाणी' या पुस्तकातून तर ती फार सुंदर रीतीने प्रकट झाली आहे. स्वतः एका विशिष्ट विचारसरणीचे पाईक असूनही प्रधान मास्तर हे पुस्तक लिहू शकले, कारण स्वतःइतकाच इतरांच्या मतांविषयी त्यांना वाटणारा आदर. "जसा जगत आहे तसाच शब्दात आहे' असा बाणा जपत त्यांनी केलेली अथक "जीवनसाधना' पुढील अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील.


 
 
About Us | Contact Us | Privacy Policy | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2010 DainikGomantak.com - All rights reserved.
of
Powered By: