Last Update:
 
महाराष्ट्र-कर्नाटक

तरुणीवर अत्याचार; गाव पातळीवर प्रकरण मिटले
सकाळ वृत्तसेवा
Thursday, June 03, 2010 AT 05:52 PM (IST)
Tags: maharashtra
सावंतवाडी, ता. १ : कारिवडे परिसरातील तरुणीवर अत्याचाराचे प्रकरण आज येथील पोलिस ठाण्यात आले. संबंधिताने अत्याचारग्रस्त तरुणीची जबाबदारी घेण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे तूर्तास पोलिस ठाण्यात तक्रार नोंद झालेली नाही; मात्र तक्रार आल्यास कायदेशीर कारवाई करणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक अविनाश काळदाते यांनी आज दिली.
कारिवडे परिसरातील तरुणीच्या असाह्यतेचा गैरफायदा घेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आले. नोकरीचे आमिष दाखवून व असाह्यतेचा गैरफायदा घेऊन गेले काही दिवस चाललेले हे प्रकरण गाव पातळीवरच मिटविण्याचे प्रयत्न होते. त्या मुलीबाबत घडलेल्या या प्रकाराची जाहीर वाच्यता होऊ नये, यासाठी संबंधितांनी आवश्‍यक ती सर्व खबरदारी घेतली. कुणालाही याची कानोकान खबर लागू नये, याकरिता त्या मुलीचे लग्न ठरविण्याचा घाट घालण्यात आला.
संबंधित युवती सुशिक्षित असल्याने तिला स्थळ शोधून देऊन संबंधिताने तो मी नव्हेच असा विश्‍वामित्री पावित्रा घेण्याची शक्कल लढविली. त्याप्रमाणे काही दिवसांपूर्वी संबंधित अत्याचारग्रस्त तरुणीचे ओटवणे परिसरातील तरुणाशी लग्न लावून देण्यात आले. लग्नानंतर काही दिवसांनी घरच्यांना संशय आला. संबंधित तरुणीची काही कारणांसाठी वैद्यकीय तपासणी झाली, तेव्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती ऐकून नवऱ्या मुलाला धक्का बसला. आपण फसलो गेल्याचे त्याच्या निदर्शनास आले. तेव्हा नवऱ्या मुलाच्या घरच्यांनी व वाडीतील प्रतिष्ठितांनी संबंधिताला फैलावर घेतले.
अत्याचारग्रस्त तरुणी व संबंधित एकाच समाजातील असल्याने हा विषय समाजाच्या बैठकीत सोडविण्याचे ठरले. त्याप्रमाणे काल दोन्ही गावातील संबंधित समाजातील प्रतिष्ठितांची बैठक झाली. बैठकीत सुरवातीला त्याने असा काही प्रकार घडलाच नसल्याचे सांगितले; पण नंतर सर्वांसमोर त्यांनी कबुली दिल्याचे सांगण्यात आले. या प्रकाराची जबाबदारी घेत संबंधिताने त्या नवऱ्या मुलाला लग्न खर्च पन्नास हजार देण्याचे मान्य केले. त्याप्रमाणे तो खर्च देण्यात आला; पण अत्याचारग्रस्त तरुणीच्या भवितव्याचे काय, असा प्रश्‍न उपस्थित झाला. तेव्हा संबंधिताने "त्या' तरुणीशी लग्न करावे, असाही पर्याय पुढे आला; मात्र पन्नाशीकडे झुकलेल्याशी लग्न करून देण्यापेक्षाने त्याने संबंधित तरुणीची जबाबदारी घ्यावी, असाही पर्याय ठेवण्यात आला.
यासंदर्भात आज दोन्ही बाजूंनी पोलिस ठाणे गाठल्याचे पोलिस निरीक्षक काळदाते यांनी सांगितले. संबंधिताने अत्याचारग्रस्त तरुणीची जबाबदारी स्वीकारण्याचे मान्य केले. यावर एकमत होत नसल्यास संबंधितांनी तक्रार द्यावी. तक्रारीनुसार पोलिस कारवाई होईल; मात्र तडजोडीबाबत पोलिस काही सांगणार नाहीत. तो निर्णय संबंधितांनी घ्यायचा असल्याचे श्री. काळदाते यांनी सांगितले.


 
 
About Us | Contact Us | Privacy Policy | Ad Rate Card
© Copyrights 2010 DainikGomantak.com - All rights reserved.
of
Powered By: