Last Update:
 
क्रीडा

क्रिकेट वर्ल्ड कपची तिकिटे खिशाला परवडणारी पवार.
सकाळ वृत्तसेवा
Thursday, June 03, 2010 AT 12:00 AM (IST)
मुंबई, ता. १  अवघ्या नऊ महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या तिकीट विक्रीचे बिगूल आज मुंबईत वाजले. ऑनलाईन तिकीट विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या तिकिटांमधील पहिले तिकीट विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या संयोजन समितीचे आणि आयसीसीचे पुढील अध्यक्ष शरद पवार यांनी खरेदी केले.
त्याचवेळी त्यांनी क्रिकेटच्या या महामेळ्याची तिकिटे स्वस्त आणि सहज उपलब्ध होणारी असतील, अशी ग्वाही दिली.
भारत-श्रीलंका-बांगलादेशमध्ये संयुक्तपणे होणाऱ्या विश्‍वकरंडक क्रिकेट समितीच्या संघटन समितीची बैठक आज अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थित "क्रिकेट सेंटर'मध्ये झाली. ऑनलाईन तिकीट विक्रीच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात करणे हा याबैठकीचा प्रमुख उद्देश होता.
वेस्ट इंडीजमध्ये गतवेळेस झालेल्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेस तिकिटांच्या जास्त किमतीमुळे प्रेक्षकांनी पाठ फिरविली होती, हा अनुभव आयसीसीला असल्यामुळे शरद पवार यांनी आपल्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या विश्‍वकरंडक स्पर्धेत तिकिटे स्वस्त ठेवण्यावर अधिक भर दिला आहे. काही महिन्यांपूर्वी स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करणाऱ्या पत्रकार परिषदेतही त्यांनी तिकिटे स्वस्त असतील असे सांगितले होते.
आजच्या बैठकीनंतर बोलताना पवार म्हणाले, भारत तसेच बांगलादेश आणि श्रीलंका आणि इतर देशातीलही क्रिकेटप्रेमी स्वस्त तिकिटांमुळे या स्पर्धेसाठी येऊ शकतील आणि स्पर्धेचा घटक होऊ शकतील.

तयारीबाबत समाधान
प्रत्येक सामन्याची केवळ पाच टक्के तिकिटे ऑनलाईन विकली जातील आणि उर्वरित तिकिटांची त्या त्या ठिकाणी विक्री केली जाईल, असे सांगताना पवार यांनी स्टेडियमच्या तयारीबाबत समाधान व्यक्त केले. ही स्पर्धा भव्यदिव्य आणि यशस्वीपणे पार पडेल, तसेच २ एप्रिल २०११ रोजी होणारा अंतिम सामना वानखेडे स्टेडियमवर होईल, असाही विश्‍वास पवार यांनी व्यक्त केला.

सुरक्षेला सर्वाधिक प्राधान्य
या बैठकीस उपस्थित असलेला आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी हरुन लॉर्गत यांनी १९ फेब्रुवारी ते २ एप्रिल या कालावधीत होणाऱ्या या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी सुरक्षेला सर्वाधिक प्राधान्य असल्याचे सांगितले. खेळाडू तसेच प्रेक्षकांच्या सुरक्षिततेसाठी आम्ही "मास्टर सुरक्षा प्लान' तयार करणार असल्याचे स्पष्ट केले
स्पर्धेचे सामने होणाऱ्या १३ ठिकाणांची पाहणी करण्यासाठी ८ जूनपासून सुरुवात होणार असल्याचे सांगून स्पर्धेचे संचालक रत्नाकर शेट्टी म्हणाले, स्पर्धेच्या कालावधीत एका देशातून दुसऱ्या देशात (भारत- बांगलादेश-श्रीलंका) सामन्यांसाठी जाण्या-येण्याकरिता व्हिसाच्या नियमात बदल करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले. स्पर्धेच्या १७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या उद्‌घाटनासाठी मोफत प्रवेश देण्यात येईल.



 
 
About Us | Contact Us | Privacy Policy | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2010 DainikGomantak.com - All rights reserved.
of
Powered By: