लाहोरमध्ये रुग्णालयावर हल्ला
सकाळ वृत्तसेवा
Thursday, June 03, 2010 AT 05:51 PM (IST)
लाहोर, ता. १ ः शहराच्या मध्यवर्ती भागातील जिना रुग्णालयावर दहशतवाद्यांनी सोमवारी रात्री केलेल्या हल्ल्यात १२ जण ठार झाले आहेत. दहशतवाद्यांनी काही जणांना ओलीस ठेवले असल्याचे वरिष्ठ डॉक्टरांनी सांगितले. मात्र इतर स्रोतांनी दिलेल्या माहितीनुसार या हल्ल्यात पाच जण मारले गेले आहेत.
गेल्या आठवड्यात लाहोरमधील एका मशिदीवर करण्यात आलेल्या हल्ल्यात एका दहशतवाद्याला पोलिसांनी पकडले होते. अमीर मुविया असे त्याचे नाव आहे. त्याच्यावर जिना रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याच्या सुटकेसाठी हा हल्ला करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
जिना रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जावेद इक्रम यांनी दिलेल्या माहितीनुसार, ""दहशतवाद्यांचा एक गट रुग्णालयात घुसला आणि त्यांनी बेछूट गोळीबार सुरू केला. या गोळीबारात किमान १२ जण जखमी झाले आहेत.'' हा हल्ल्यानंतर पोलिसांचे कमांडो पथकही तातडीने घटनास्थळी पोचले व त्यांनी केलेल्या कारवाईत एक दहशतवादी मारला गेल्याचे समजते. मात्र पोलिसांनी त्याला दुजोरा दिलेला नाही. हल्ला झाला त्या वेळी रुग्णालयात सुमारे ८०० रुग्ण होते. बाहेर पडण्यासाठी दहशतवाद्यांनी काही डॉक्टरांनाच पकडून ठेवले होते, अशी माहिती पंजाबचे पोलिस प्रमुख तारिक डोगर यांनी दिली. पोलिसांनी चोख प्रत्त्युतर दिल्यानंतर दहशतवादी पळून गेल्याचेही डोगर यांनी सांगितले.
वरिष्ठ सरकारी अधिकारी सज्जाद भुट्टा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ""चार दहशतवादी पोलिसांच्या वेशात रुग्णालयात आले होते. त्यांच्या एका साथीदारावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याने ते त्या दिशेने गोळीबार करत पळाले. मृतांमध्ये तीन पोलिस, एक महिला आणि आणि एक खासगी सुरक्षा यांचा समावेश आहे.''