Last Update:
 
अर्थविश्‍व

दर्जाबाबत गोवा डेअरीकडून तडजोड नाही!
सकाळ वृत्तसेवा
Thursday, June 03, 2010 AT 05:36 PM (IST)
Tags: Economic
गोवा सहकारी दूध उत्पादक संघाचे दूध किंचित महाग असले तरी दुधाच्या दर्जाबाबत कधी तडजोड केली नाही. दर्जाबाबत गोवा दूध उत्पादक संघ आघाडीवर आहे. परराज्यातील दूध संस्थांकडून गोव्यात वितरण होणाऱ्या दुधाशी तुलना करता गोवा डेअरीच्या दुधात कधीच आरोग्याला हानिकारक द्रव्ये आढळून आली नाहीत. त्यामुळे गोमंतकीयांत गोवा डेअरीच्या उत्पादनाबद्दल विश्‍वास आहे, असे प्रतिपादन गोवा सहकारी दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष माधव सहकारी यांनी आज केले.
ढवळी येथील मातृछायेत आयोजित जागतिक दुग्ध दिन कार्यक्रमानिमित्त श्री. सहकारी बोलत होते. ते पुढे म्हणाले, गोमंतकीयांच्या याच विश्‍वासाच्या आधारावर व सहकार्यामुळे गोवा डेअरी वार्षिक सुमारे पाच लाख रुपये सामाजिक कार्यासाठी खर्च करते. असे कार्य गोव्यात दूध वितरणाद्वारे नफा कमवत असलेल्या इतर व्यावसायिक दूध संस्थांकडून अपेक्षित आहे. भविष्यातही गोवा दूध उत्पादक संघाला गोव्याच्या जनतेकडून सहकार्याचा हात हवा.
जागतिक पातळीवर २००१ पासून दुग्ध दिन साजरा करण्यात येत असून, यंदा प्रथमच गोव्यात गोवा डेअरीतर्फे ढवळी येथील "मातृछाये'मध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मातृछायेच्या संचालिका मंदाकिनी पाटील, गोवा सहकारी दूध उत्पादक संघाचे संचालक उल्हास सिनारी, अजय देसाई, डॉ. दत्ता धुरी, डॉ. एन. सी. सावंत, तसेच डॉ. बाळे, नितीन कोलवेकर कवळेच्या पंच सौ. संध्या संदीप नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री. सहकारी पुढे बोलताना म्हणाले, आज जगातील अनेक नागरिकांना वेळेवर अन्न मिळत नाही. अशा वेळी जगातील सुमारे १९१ देशांची परिषद होऊन तांदूळ व इतर कडधान्यांपेक्षा पोषण मूल्य असलेले दूध अशा गरीब लोकांच्या अन्नाची गरज भागवू शकेल, असे मत बनले असून ते सर्वांना मिळावे यासाठी प्रयत्नशील आहे. गोवा सहकारी दूध उत्पादक संघ ही सहकारी तत्त्वावर चालणारी ही संस्था असून, शेतकऱ्यांचे हित सांभाळून सामाजिक कार्यातही सहभागी होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी डॉ. दत्ता धुरी यांनी जागतिक दुग्धदिनाचे महत्त्व सांगितले. जागतिक अन्न व कृषी संघटनेच्या प्रेरणेतून हा दिवस साजरा होत असल्याचे ते म्हणाले. मातृछायेच्या संचालिका मंदाकिनी पाटील यांनी गोवा डेअरीकडून मिळत असलेल्या सहकार्याबद्दल आभार मानण्यात आले. गोवा दूध उत्पादक संघातर्फे माधव सहकारी यांच्या हस्ते मातृछायेमधील मुलांना सुगंधी दूध, श्रीखंडाचे वितरण करण्यात आले. डॉ. एन. सी सावंत यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. दत्ता बुरये यांनी आभार मानले.


 
 
About Us | Contact Us | Privacy Policy | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2010 DainikGomantak.com - All rights reserved.
of
Powered By: