जादूची बाटली
सकाळ वृत्तसेवा
Thursday, June 03, 2010 AT 05:47 PM (IST)
सकाळी आई-बाबा ऑफिसला गेले की आजोबा नाश्ता करतात आणि मग आरामात कॉटवर बसून तास दोन तास पेपर वाचतात. पण त्याआधी त्यांचे एक महत्त्वाचे काम आजीला करावे लागते. आजोबांचा चष्मा शोधून ठेवावा लागतो.
दोन दिवसांकरिता आजी बाहेर गावी गेली होती. आजोबांचा नाश्ता जरा लवकरच झाला. सवयीने ते कॉटवर जाऊन बसले. पण त्यांना पेपर काही वाचता येईना. कारण त्यांना चष्मा काही केल्या मिळेना. आजोबांची शोधाशोध सुरू झाली. आजोबांची शोधाशोध म्हणजे सगळ्या घरभर पसारा. त्यांनी नेहमीच्या ठिकाणी पाहिलं, पण छे! चष्मा काही मिळेना आणि पेपर वाचल्याशिवाय आजोबांना काही चैन पडेना.
मिहीर म्हणाला, "मी तुम्हाला मदत करतो, पण ही शोधाशोध थांबवा.' आजोबांनी हसत मान डोलवली. मिहिरने स्वयंपाकघरात जाऊन एक काचेची गोल बाटली आणली. आजोबांच्या समोर ठेवली. मग एका भांड्यात पाणी आणलं. आता आजोबांची अस्वस्थता वाढली. आता मिहीर भांड्यातलं पाणी बाटलीत सावकाश ओतू लागला. बाटली भरून पाणी बाहेर वाहू लागलं तेव्हा मिहीर थांबला. आता मात्र आजोबा वैतागले. ते म्हणाले, "अरे हा काय खेळ चालवलायस? माझा चष्मा कुठाय? आणि हे किती पाणी सांडलंस बघ! आता ते पुसून टाक आधी.''
पाण्याने काठोकाठ भरलेली बाटली मिहिरने झाकण लावून गच्च बंद केली. बाटली आणि सांडलेलं पाणी त्यानं पुसलं. बाटली आजोबांच्या समोर ठेवत तो म्हणाला, "हं, हा घ्या तुमचा वाचायचा चष्मा.'
आजोबा मिहिरकडे संशयानं पाहू लागले. मिहिरला वेड लागलंय, की तो मुद्दामहून वेड्यासारखं करतोय, त्यांना काहीच कळेना. ते मिहिरला जवळ घेत म्हणाले, "बाळ मिहिरु, याला पाण्याची बाटली म्हणतात, चष्मा नाही! आणि पाण्याची बाटली म्हणजे जर चष्मा असेल तर मग चष्म्याला काय म्हणायचं..? मला प्यायला पाणी नकोय तर वाचायला चष्मा हवाय. कळलं?'
आजोबांकडे डोळे मोठे करून पाहत मिहीर म्हणाला, "अहो आजोबा, तुम्हाला वाचायला पाणी पाहिजे म्हणून हा चष्मा दिलाय. आता टकाटक पेपर वाचा.'
आता आजोबा रागावून काही बोलणार इतक्यात मिहिरने ती बाटली घेतला आणि पेपरवर आडवी ठेवली आणि काय आश्चर्य! छोटी छोटी अक्षरं आता मोठी मोठी दिसू लागली. आजोबांनी बाटली उचलून हातात घेतली. त्यांच्या तळहातावरच्या बारीक बारीक रेषा आता त्यांना स्पष्ट दिसू लागल्या.
"गोल काचेच्या बाटलीत जर काठोकाठ पाणी भरलं आणि बाटली गच्च बंद केली तर त्याचा छोटा सूक्ष्मदर्शक तयार होतो, असं आम्हाला शाळेत शिकवलंय. मुंगी, डास आणि काही फुलांच्या पाकळ्यांचं निरीक्षण आम्ही या सूक्ष्मदर्शकातून केलंय. म्हणून मी विचार केला.. जर यातून मुंगी मोठी दिसते, तर या पेपरातली ही मुंगी एवढी अक्षरं का मोठी दिसणार नाहीत? म्हणजे तुमच्यासाठी झाला हा स्पेशल "पाण्याचा चष्मा.' मिहिरने हे सर्व सांगताच आजोबा सुखावले.
मिहिरला जवळ घेत म्हणाले, "अरे पण असं का होतं माहीत आहे का? मध्यभागी फुगीर आणि कडेला निमुळते होत गेलेले भिंग हे बहिर्गोल भिंग असते. या भिंगामुळे सरळ रेषेत जाणारा प्रकाशकिरण वाकवला जातो आणि हे बहिर्गोल भिंग प्रकाशकिरण एकत्रित करते, पण भिंगाच्या मध्यातून जाणारा किरण मात्र वाकत नाही. तो सरळ रेषेत आरपार जातो. बहिर्गोल भिंगातून वस्तूची प्रतिमा मोठी दिसते. या ठिकाणी पाण्याचा थेंब हा बहिर्गोल भिंगासारखा असतो. त्यामुळे पाणी भरलेली गोल बाटली जर डोळ्यासमोर धरली तर पलीकडचं सर्व मोठं दिसतं.'
माझा मित्र म्हणाला की या बहिर्गोल भिंगाने कागदही पेटवता येतो! हे खरं आहे का हो आजोबा? असं मिहिरने सांगताच आजोबा म्हणाले, "हो ते खरं आहे, पण लहान मुलांनी असले प्रयोग, मोठी माणसे जवळ असतानाच करावेत बरं. आता तुझी आजी घरी आली की आपण बहिर्गोल भिंगाच्या मदतीने पाणीसुद्धा गरम करू.
आता प्लीज माझा काचेचा चष्मा शोध. तोपर्यंत या पाण्याच्या चष्म्याने पेपरातल्या महत्त्वाच्या बातम्या मी वाचतो.
मिहीर पटकन म्हणाला, "आजोबा, चष्मा तर तुमच्या खिशातच आहे की. यावर आजोबा हसत म्हणाले, "अरे बापरे! आता मला चष्मा शोधायचा दुसरा चष्माच आणला पाहिजे वाटतं...!!