तिकीट दरवाढीसाठी बस मालक वाट पाहणार
सकाळ वृत्तसेवा
Thursday, June 03, 2010 AT 05:49 PM (IST)
पणजी, ता. १ (प्रतिनिधी) ः तिकीट दरवाढीसंदर्भात अभ्यासपूर्ण प्रस्ताव सरकारला सादर करण्याचे आश्वासन वाहतूक संचालक स्वप्नील नाईक यांनी दिल्यामुळे तिकीट दरवाढीसाठी वाट पाहण्याचा निर्णय आज अखिल गोवा खासगी बसमालक संघटनेने घेतला आहे.
खासगी बससेवेला उद्योगाचा दर्जा द्यावा, विद्यार्थ्यांना ५० टक्के सवलत देण्यात येत असल्यामुळे कदंब वाहतूक महामंडळाला मिळणारे अनुदान खासगी बसमालकांना मिळावे, अशी मागणी आजच्या बैठकीत पुढे आली आहे. ही माहिती अखिल गोवा बसमालक संघटनेचे सरचिटणीस सुदीप ताम्हणकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. येथील टी. बी. कुन्हा सभागृहात ही बैठक झाली.
२० पैसे प्रती किलोमीटर दरवाढ लांबच्या प्रवासासाठी मिळावी अशी बसमालकांची मागणी आहे. सदर प्रस्ताव तयार असून वाहतूक सचिवांना तो आजच पाठवू, त्यानंतर सरकार निर्णय घेईल, अशी माहिती बसमालक संघटनेच्या शिष्टमंडळाने श्री. नाईक यांची काल भेट घेतली असता दिली. पंधरा दिवसांत बस तिकीट दरवाढीसंदर्भात निर्णय होईल, असे आश्वासन श्री. नाईक यांनी मागे दिले होते व अजूनही आठ दिवस त्यासाठी बाकी असल्यामुळे बसमालकांनी वाट पाहायचे ठरवले असल्याचे श्री. ताम्हणकर यांनी स्पष्ट केले.
खासगी बसमालकांनी राज्याला सेवा दिली असून बससेवेला उद्योगाचा दर्जा मिळायला हवा, विद्यार्थ्यांना सवलत देण्यास आम्ही तयार आहोत परंतु थोडी भरपाई व्हायला हवी, असे मत सुदेश कळंगुटकर यांनी व्यक्त केले.