Last Update:
 
शब्दसोहळा

जोड्या जमल्या.
सकाळ वृत्तसेवा
Thursday, June 03, 2010 AT 05:44 PM (IST)
Tags: Bollywood
प्रदर्शनाच्या वाटेवर असलेल्या हिंदी चित्रपटांमध्ये प्रेक्षकांना आगळ्यावेगळ्या जोड्यांची केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. बॉलिवूडमधील हा नवा ट्रेंड काय जादू करेल?
. मे-जून या दोन महिन्यांमध्ये बरेच बहुचर्चित आणि मोठ्या बजेटचे चित्रपट प्रदर्शित होत आहेत. बहुचर्चित चित्रपट म्हटला, की नायक-नायिकेची एखादी सुपरहिट जोडी त्यामध्ये झळकणार असा सर्वसाधारण समज असतो. आगामी चित्रपट मात्र या समजाला छेद देणारे आहेत. या चित्रपटांमध्ये आगळ्यावेगळ्या जोड्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. अलीकडेच प्रदर्शित झालेल्या "काइट्‌स' हा त्यापैकी एक चित्रपट. बरेच दिवसांपासून हृतिक आणि बार्बरा यांच्यामुळे "काइट्‌स' चर्चेत राहिला. कंगना रानावतची मात्र फारशी चर्चा झाली नाही. प्रत्यक्षात "काइट्‌स'मध्ये कंगना आणि हृतिक ही जोडी प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी आहे. हृतिकनेही कंगनाच्या अभिनयाचे कौतुक केले आहे. हृतिक आणि कंगना यांना घेऊन अनुराग बसूने नवा प्रयोग केला आहे.
दुसरीकडे चर्चेत असलेला चित्रपट म्हणजे "रावण'. या चित्रपटात तमीळ अभिनेता विक्रमने ऐश्‍वर्या रायच्या नायकाची भूमिका बजावली आहे. चित्रपटात अभिषेकची प्रमुख भूमिका असताना ऐश्‍वर्या आणि विक्रम ही जोडी प्रेक्षकांना कितपत भावते हे पाहायचे. "रावण'च्या मूळ तमीळ व्हर्जनमध्ये विक्रमने प्रमुख भूमिका साकारली आहे. आता हिंदी व्हर्जनमध्ये वेगळ्या प्रकारची भूमिका साकारणे त्याच्यासाठी आव्हानात्मक होते. ते त्याने चांगल्या प्रकारे पेलल्याची चर्चा आहे. विक्रमची पत्नी शैलाने त्याच्या ऐश्‍वर्याबरोबरच्या केमिस्ट्रीचे भरभरून कौतुक केले. विक्रम ऐश्‍वर्याच्या नृत्यकौशल्यामुळे भारावला आहे.
"राजनीती' या चित्रपटाचे मूळ आकर्षण म्हणजे कतरिना कैफचे आगळे रूप. सध्या "प्रोमोज'मुळे रणबीर आणि कतरिना प्रकाशझोतात आले असले तरी प्रत्यक्षात चित्रपटात "लव्ह ट्रॅंगल' पाहायला मिळेल. रणबीर आणि अर्जुन रामपाल या दोन भावांमध्ये कतरिना गोंधळलेली असते. तिचे रणबीरवर प्रेम असते आणि लग्न मात्र अर्जुन रामपालशी होते. कतरिना आणि अर्जुन या जोडीमधली केमिस्ट्री कितपत यशस्वी होते, हे चित्रपटाच्या प्रदर्शनानंतरच कळेल. याशिवाय सध्या चर्चेत असलेला चित्रपट म्हणजे "आय हेट लव्ह स्टोरीज'. या चित्रपटात सोनम कपूर आणि इमरान खान एकत्र आले आहेत. "लक' आणि "किडनॅप' नंतर इमरान रोमॅंटिक कॉमेडी चित्रपटातून पुढे येत आहे. दुसरीकडे सोनमने आतापर्यंत आधुनिक तरुणीची भूमिका साकारलेली नाही. मात्र, "आय हेट लव्ह स्टोरीज'मध्ये दोघांनीही आपले अभिनयकौशल्य पणाला लावले आहे. बॉलिवूडमध्ये नव्याने येत असलेल्या या जोड्या कितपत यश मिळवणार हे लवकरच कळेल.


 
 
About Us | Contact Us | Privacy Policy | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2010 DainikGomantak.com - All rights reserved.
of
Powered By: