Last Update:
 
गोमंतक विशेष

स्वतःच्या वागणुकीतून धडे देणारे भाऊ
सकाळ वृत्तसेवा
Thursday, June 03, 2010 AT 05:37 PM (IST)
त्यांच्या मायेच्या सावलीत आम्ही वाढलो. त्यांचा दरारा त्यांच्या डोळ्यातून, वागणुकीतून व्यक्त व्हायचा. रात्री उशिरापर्यंत देवळातल्या नाटकांना जायचे झाल्याससुद्धा भाऊंची परवानगी लागायची, ठरावीक वेळेत यायचे आदेश मिळायचे आणि आम्ही येईपर्यंत त्यांचे वाट पाहणे असायचे. शाकाहाराकडे ओढले गेलेले भाऊ, जंगलाकडे ओढा असलेले भाऊ आणि राजकारणी, लेखक, कलाकारांसमवेत चर्चेत रममाण झालेले भाऊ. चतुर्थी आणि दिवाळीत लोकांकडे जाणारे भाऊ अशी त्यांची कित्येक रूपे माझ्या हृदयाच्या आठवणीत साठलेली आहेत...
"लोकांच्या आवारातली, परसातली तोडून, चोरून आणलेली फुले देवाला आवडत नाहीत.'
आमचे वडील गोव्याचे माजी मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांचे हे शब्द. लहानपणी मैत्रिणींच्या आग्रहास्तव मोहात पडल्यामुळे दुसऱ्याच्या बागेतली फुले देवासाठी तोडून आणल्यावेळी यापुढे ही अशी कृती नको असा अप्रत्यक्ष सल्लाच त्या शब्दातून मला मिळाला. माझे वय होते अवघे आठ. भाऊ बोलायचे खूप कमी, बोलणे झालेच तर ते सरळसोट. आपल्या कृतीतून, वागणुकीतून त्यांनी आम्हाला धडे दिले.
मुलगा आणि मुलगी यांत फरक तो काय करायचा? मुलगा, मुलगी समान ही विचारसरणी त्यांनी आमच्यात बिंबवली. गोव्याबाहेर उच्च शिक्षणासाठी पाठवणारे, स्वतः वाहनचालक बनून वाहन चालवण्यास मला त्यावेळी शिकवणारे भाऊ आदर्श बाबाच. उत्तम वाहनचालक होते ते. त्यांचा शिकारीचा नाद अनोखा. नाटकाहून येण्यास उशीर झाल्यामुळे शिक्षेपोटी एकदा असाच सकाळचा गव्हाच्या सत्वाचा नाश्‍ता मिळाला नाही. उपाशीपोटी शाळेत गेले होते, पण शिक्षकांनी घरी पाठवले, नंतर कळले निरोप भाऊंचा. त्यावेळी चहा, कॉफीपासून आम्ही दूर. चुकून बेशिस्तपणा झाल्यास शिक्षेसाठी उंच टेबल होतेच. आज त्यांनी दिलेल्या धड्यांचे महत्त्व लक्षात येते, आपल्या कृतीतून त्यांनी आमच्यात संस्कार रुजवले.
त्यांच्या मायेच्या सावलीत आम्ही वाढलो, परंतु मातलो नाही. त्यांचा दरारा त्यांच्या डोळ्यातून, वागणुकीतून व्यक्त व्हायचा. रात्री उशिरापर्यंत देवळातल्या नाटकांना जायचे झाल्याससुद्धा भाऊंची परवानगी लागायची, ठरावीक वेळेत यायचे आदेश मिळायचे आणि आम्ही येईपर्यंत त्यांचे वाट पाहणे असायचे. लहानपणापासून मला त्यांनी आपल्या बरोबर कित्येक ठिकाणी नेल्याचे आठवते. वयाच्या तेरा वर्षांपर्यंत त्यांच्या मागेमागे मी असे, कित्येक प्रश्‍न विचारून भंडावून सोडत असे, पण उत्तरे मिळायची. ते हरिभजनी रमणारे किंवा सगळा वेळ देव देव करणारे नव्हते, परंतु पूजा मनापासून स्वतः करीत. संध्याकाळी आम्हालाही घेऊन देवासमोर बसत. नंतर प्रार्थना व्हायची. असे आमचे भाऊ. शाकाहाराकडे ओढले गेलेले भाऊ, जंगलाकडे ओढा असलेले भाऊ आणि राजकारणी, लेखक, कलाकारांसमवेत चर्चेत रममाण झालेले भाऊ. चतुर्थी आणि दिवाळीत लोकांकडे जाणारे भाऊ अशी त्यांची कित्येक रूपे माझ्या हृदयाच्या आठवणीत साठलेली आहेत. राजकीय रणनीती आखण्यात ते चतुर होतेच, परंतु कूटनीती त्यांना माहिती नव्हती व त्यामुळेच ते विरोधकांचेही चांगले मित्र म्हणून अखेरपर्यंत राजकारणात राहू शकले.
ते शीघ्रकोपी नव्हते, पण राग आल्यास त्यांचा लालबुंद झालेला चेहरा बरेच काही सांगून जात असे.
त्यांचा लोकसंपर्क दांडगा, फक्त राज्य आणि देशापुरताच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात लोकांशी त्यांच्या ओळखी होत्या. आपल्याला नोकरी करायची नाही हे त्यांच्या मनावर ठसलेले असावे आणि त्यांनी ते माझ्या आईच्या वडिलामार्फत आपल्या वडिलांपर्यंत पोचवले. दुकानदारी, हॉटेलसारख्या छोट्या व्यवसायातून ते भागीदारीत खाण व्यवसायात आले आणि खनिज लीज हाती आल्यानंतर उद्योगाचा विस्तारही झाला. परंतु तेथे स्वार्थ नव्हता तर समाजाचाही विचार होता. पैसा मिळवण्यात त्यांना स्वारस्य नव्हते. छक्केपंजे, फसवणूक नव्हती. व्यवसायात नुकसानही झाले. थोड्या समस्या उदभवल्या, परंतु आमच्याकडे काही नाही असे आम्हाला कधी वाटले नाही, आम्ही आनंदात राहिलो.
भाऊ निष्काम कर्मयोगी होते. दूरदृष्टी असलेले त्यांचे व्यक्तिमत्त्व उद्यमशीलता गोव्यात रुजवू शकले. आजचा संजीवनी सहकारी साखर कारखाना असो किंवा बिर्लांचा झुआरी, सीबा, एम आर एफ त्यांच्याच कालावधीतले प्रकल्प. राजकीय सत्तेचा त्यांनी लोककल्याणासाठी वापर केला, त्यांचे विचार चांगले होते व दुर्गम इच्छाशक्तीच्या बळावर त्यांनी गोव्याच्या चौफेर विकासाचा पाया घातला. औद्योगिक वसाहतींचे आणि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे स्वप्न त्यांचेच.


 
 
About Us | Contact Us | Privacy Policy | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2010 DainikGomantak.com - All rights reserved.
of
Powered By: