पाकचे लवकरच अण्वस्त्रांचे शतक
सकाळ वृत्तसेवा
Friday, June 04, 2010 AT 02:17 PM (IST)
लंडन, ता. ३ (पीटीआय) ः पाकिस्तानच्या अण्वस्त्रनिर्मितीच्या क्षमतेत लक्षणीय वाढ होणार असल्यामुळे दक्षिण आशियातील परिस्थिती आणखी नाजूक होणार आहे. पाकिस्तानमुळे दक्षिण आशियातील अण्वस्त्र समतोलास धक्का पोचण्याची शक्यता आहे.
दहशतवादी कारवायांमुळे अस्थिर असणाऱ्या पाकिस्तानकडे साठ अण्वस्त्रे असून, कमी वेळात शंभर अण्वस्त्रांची निर्मिती करण्याची क्षमता त्यांच्याकडे असेल. या तुलनेत भारताकडे ६० ते ७० अण्वस्त्रेच असल्याची माहिती स्वीडनच्या "स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट'च्या (सिप्री) वार्षिक अहवालात नमूद करण्यात आली आहे.
या अहवालामध्ये भारत आणि पाकिस्तानच्या अण्वस्त्र क्षमतेची तुलना करण्यात आली आहे. पाकिस्तानकडे साठ अण्वस्त्रे तयार असून, खुशाबमधील त्यांच्या दोन प्लुटोनियम अणुभट्ट्या कार्यान्वित होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे पाकिस्तानच्या अण्वस्त्रनिर्मिती क्षमतेमध्ये सात पटींनी वाढ होणार असल्याचे निरीक्षण अहवालात नोंदविण्यात आले आहे.
हवेतून मारा करणारे क्षेपणास्त्र विकसित करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न असून, जमिनीवरून मारा करणाऱ्या सबसॉनिक बाबर क्षेपणास्त्राच्याही चार चाचण्या घेण्यात आल्या आहेत. मात्र, या क्षेपणास्त्रातून अणुबॉंबचा मारा करता येऊ शकेल का, हे स्पष्ट होऊ शकले नाही. अण्वस्त्र यंत्रणेसाठी पाकिस्तानने "एफ-१६' विमानांचा वेगळा ताफा तयार ठेवला आहे. याशिवाय गझनवी-१ आणि शाहीन-१ या छोट्या पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांद्वाराही अण्वस्त्रांचा मारा करणे पाकिस्तानला
शक्य होईल. अनुक्रमे ४०० आणि १२०० किलोमीटरचा पल्ला असणारी गझनवी-१ आणि शाहीन-१ ही दोन्ही क्षेपणास्त्रे सज्ज आहेत. मध्यम पल्ल्याची घौरी-१ आणि शाहीन-२ ही दोन क्षेपणास्त्रे विकसित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
या तुलनेत भारताकडे ६० ते ७० क्षेपणास्त्रे आहेत आणि अण्वस्त्र यंत्रणेमध्ये पृथ्वी-१ (५०० किलोमीटरचा पल्ला), मध्यम पल्ल्याचे अग्नी-१ (७०० किलोमीटर) या दोन क्षेपणास्त्रांचा समावेश आहे. अग्नी-२ (१२०० किलोमीटर) आणि अग्नी-३ (३००० किलोमीटर) या दोन क्षेपणास्त्रांचा विकास सुरू असून, यापैकी अग्नी-२ प्रायोगिक वापरासाठी लष्कराकडे सुपूर्त करण्यात आले आहे. याशिवाय, सबसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र "निर्भय' आणि समुद्रातून मारा करता येणारे क्षेपणास्त्र "शौर्य' (के- १५) विकसित करण्यात येत आहेत. युद्धनौकेतून मारा करता येणाऱ्या धनुष क्षेपणास्त्राच्या तैनातीची प्रक्रिया सुरू असल्याचेही या अहवालात म्हटले आहे.