काश्मीर पुन्हा धुमसतेय!
सकाळ वृत्तसेवा
Wednesday, July 07, 2010 AT 03:15 PM (IST)
श्रीनगर - काश्मीर खोऱ्यातील तणावग्रस्त परिस्थितीमुळे प्रशासनाने आज (बुधवार) अनेक ठिकाणी अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू केली. परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस व लष्करी दल तैनात करण्यात आले आहे. दरम्यान, सुरक्षिततेच्या कारणास्तव या भागातील मोबाईल "एसएमएस' सेवा बंद करण्यात आलेली आहे.
उत्तर काश्मीरमध्ये केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) जवानांनी केलेल्या गोळीबारात आतापर्यंत नऊ वर्षांच्या मुलासह तीन जण ठार, तर 70 हून अधिक जखमी झाले आहेत.
काश्मीर खोऱ्यात मागील आठवड्यात भडकलेला हिंसाचार थंड होतो न होतो तोच कालपासून (मंगळवार) बाटमालू भागात निदर्शनाच्या वेळी पुन्हा तणाव निर्माण झाला. जमावाने सुरक्षा दलाच्या दिशेने दगडफेक सुरू केली होती. सुरक्षा दलाला जमावाने चारही बाजूने घेरले होते. जमाव पांगविण्यासाठी दलाला अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या होत्या. तसेच, केलेल्या गोळीबारात एक जण ठार झाला. त्या पार्श्वस्थानिकांकडून आज पुन्हा गोंधळ होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात केला आहे.