Last Update:
 
मुख्य पान

"नादिया तोरादोचा खूनच'
Gomantak
Thursday, July 08, 2010 AT 06:59 PM (IST)
पणजी, ता. 7 (प्रतिनिधी) : "नादिया तोरादो मनाने फारच कणखर होती. मी तिला गेली अनेक वर्षे ओळखत होते. तिने आत्महत्या केलेली नाही, तिचा खूनच केलेला आहे. खुनानंतर आरोपीने पुरावेही नष्ट केलेले आहेत. पोलिसांनी प्रकरणाची चौकशी करून पुरावे गोळा करावेत व खुन्याला शिक्षा द्यावी', असा सूर महिला चळवळीतील कार्यकर्त्यांनी पणजीतील एका बैठकीत केली.
अखिल भारतीय महिला परिषदेतर्फे गोवा चेंबरमध्ये एका बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत महिलांवर होणारे अत्याचार, महानंद नाईक प्रकरण, नादिया तोरादो मृत्यू प्रकरण आदींवर चर्चा झाली. ज्योती कुंकळकर, आवडा व्हिएगश, निर्मला सावंत, प्रमोद साळगावकर, तारा केरकर, ऍड. शुभलक्ष्मी रायकर, भारती प्रभुदेसाई आदी महिला व्यासपीठावर होत्या. बैठकीला जवळपास पन्नास महिलांची उपस्थिती होती. तारा केरकर व आवडा व्हिएगश यांनी नादिया तोरादोने आत्महत्या केली नसून तिचा खूनच झाल्याचे प्रतिपादन केले.

मिकींच्या आईला अटक करा : केरकर
नादिया तोरादो मृत्यू प्रकरणी बऱ्याच बाबी अद्याप स्पष्ट झालेल्या नाहीत. माजी मंत्री मिकी पाशेको व नादिया तोरादो यांच्या दरम्यानचे संबंध कसे होते. नादियाने रेटॉल प्राशन करण्यापूर्वी कोणकोणत्या घडामोडी घडल्या याची इत्थंभूत माहिती मिकींच्या आईला निश्‍चितच असेल. अटक करून तिची चौकशी केल्यास कैक गोष्टी उजेडात येऊ शकतील. तरीही पोलिस तिची चौकशी का करीत नाहीत हा प्रश्‍न आहे. महिलांनी संघटित होऊन नादिया तोरादो प्रकरण धसास लावण्याचे आवाहन तारा केरकर हिने केले.

पुरावे हेतुपुरस्सर नष्ट : व्हिएगश
नादियाचे 29 रोजी निधन झाले. त्यानंतर मी प्रकरण गंभीरतेने हाताळण्याबाबत मुख्यमंत्री, गृहमंत्री, राष्ट्रपती व सोनिया गांधींना पत्र पाठविले. गोव्यात अत्याधुनिक उपचारपद्धती असतानाही उपचारांसाठी नादियाला गोव्याबाहेर पाठविण्याची काय आवश्‍यकता होती? तसेच मृत्युपूर्व तिची जबानी ज्या दंडाधिकाऱ्याने घेतली आहे, ती मराठीतून आहे. नादियाला मराठी येत नव्हते. त्यामुळे तिने काय सांगितले व दंडाधिकाऱ्यांनी काय नमूद केले हा प्रश्‍नच आहे. परंतु, या सर्व गोष्टी हेतुपुरस्सर करण्यात आलेल्या आहेत, असे आवडा व्हिएगश म्हणाल्या.
यावेळी निर्मला सावंत, प्रमोद साळगावकर, ऍड. शुभलक्ष्मी रायकर यांनीही विचार व्यक्‍त केले. क्रूरकर्मा महानंद नाईक प्रकरणांवरही चर्चा झाली. महानंद दोन खटल्यातून सुटला असला तरी उर्वरित खटल्यात तो निश्‍चितपणे दोषी ठरेल, असे आवडा व्हिएगश म्हणाल्या.


 
 
About Us | Contact Us | Privacy Policy | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2010 DainikGomantak.com - All rights reserved.
of
Powered By: