Last Update:
 
क्रीडा

अशा पराभवातही समाधान वाटते ः ऑस्कर ताबारेझ
सकाळ वृत्तसेवा
Thursday, July 08, 2010 AT 06:55 PM (IST)
Tags: Football

केपटाऊन, ता. ७ ः तब्बल ६० वर्षांनी उरुग्वेचे विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्याचे स्वप्न भंगल्यानंतर आलेल्या निराशेतही उरुग्वेचे प्रशिक्षक ऑस्कर ताबारेझ यांनी खेळाडूंच्या कामगिरीची प्रशंसा केली. ते म्हणाले, ""सामन्यात अनेकदा चढउतार आले. दोन्ही संघांतील खेळाडूंनी सर्वोत्तम खेळ केला. खराब खेळून हरलो नाही. त्यामुळे अशा पराभवातही खेळाडूंच्या कामगिरीवर पूर्ण समाधानी आहे.''
विश्‍वकरंडक स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या पहिल्या लढतीत पंचांची अखेरची शिट्टी वाजेपर्यंत काय निर्णय लागेल हे सांगता येत नव्हते. कोणीच कमी पडत नव्हते. अशा रंगतदार सामन्यात युरोपियन हॉलंड काकणभर सरस ठरले. याविषयी ताबारेझ म्हणाले, ""शेवटी हा खेळ आहे. दोन्ही संघ जिंकू शकत नाहीत. एकच संघ जिंकणार. अशा पद्धतीने पराभव होणार असेल, तर तोही मला आवडेल. आमच्या मर्यादा ओळखून आम्ही त्यावर मात करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला.''
उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला असला तरी उरुग्वेला पहिल्या तीनमध्ये येण्याची अजूनही संधी आहे. रविवारी तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीत त्यांना खेळण्याची संधी मिळेल. ताबारेझ सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत खेळाडूंचे कौतुक करण्याची एकही संधी सोडत नव्हते. ते म्हणाले, ""आम्ही हॉलंडविरुद्ध ज्या पद्धतीने खेळ केला, तो बघून मला खेळाडूंचा अभिमान वाटतो. हॉलंड आमच्यापेक्षा सरस होते हे निश्‍चित; पण आम्ही त्यांच्या बरोबरीनेच खेळ केला. आम्ही पराभव स्वीकारला आहे. गोल करण्यात आमच्यापेक्षा हॉलंड सरस ठरले यात शंकाच नाही.''

विश्‍वासच बसत नाही
"आम्ही अंतिम फेरीत पोचलो यावर विश्‍वासच बसत नाही,' हॉलंडच्या विजयानंतर प्रशिक्षक बर्ट व्हॅन मार्विक यांनी व्यक्त केलेली ही पहिली प्रतिक्रिया होती. ""दोन वर्षांपूर्वी हॉलंड संघाची सूत्रे स्वीकारली तेव्हा इथपर्यंत मजल मारू, असे अजिबात वाटत नव्हते. त्या वेळी खेळाडूंना आपण एका "मिशन'वर चाललो आहोत. त्यामुळे स्वतःच्या क्षमतेवर विश्‍वास ठेवा,'' इतकेच खेळाडूंना सांगितल्याचे मार्विक यांनी या वेळी सांगितले.
सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मार्विक सातत्याने या कामगिरीवर विश्‍वासच बसत नाही, असेच सांगत होते. ते म्हणाले, ""हॉलंड एक छोटासा देश आहे. तरी ही कामगिरी करू शकलो. खरंच आश्‍चर्य वाटते. संपूर्ण सामन्यावर दोन्ही संघांचे समान वर्चस्व होते; पण उत्तरार्धात आम्ही लौकिकाला साजेसे खेळलो. आता लक्ष्य विजेतेपदाचेच असेल. बघूयात कोणता प्रतिस्पर्धी मिळतो. मला फुटबॉल जेवढे आवडते त्यापेक्षा अधिक विजय मिळवणे आवडते.''


 
 
About Us | Contact Us | Privacy Policy | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2010 DainikGomantak.com - All rights reserved.
of
Powered By: