Last Update:
 
क्रीडा

स्पेन अंतिम फेरीत
Gomantak
Thursday, July 08, 2010 AT 06:56 PM (IST)
Tags: Football
डर्बन, ता. ७ ः विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेतील विजेतेपदाचे स्वप्न साकारण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या युरोपीय विजेता स्पेनने बलाढ्य जर्मनीचा १-० असा पराभव करून अंतिम फेरीत स्थान मिळवले. पहिल्यावहिल्या विजेतेपदासाठी त्यांना आता रविवारी (ता. ११) हॉलंडशी मुकाबला करावा लागणार आहे.
डर्बन येथील मोझेस माबिदा स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्याच्या विश्रांती पूर्वीच्या पहिल्या भागात दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले. दोन्ही संघांकडून गोल करण्यासाठी रचलेल्या चाली शेवटच्या फटक्‍यापूर्वीच अयशस्वी ठरल्या. पूर्वार्धात बहुतांश वेळ जर्मनीच्या भागातच चेंडू राहिला. स्पेनच्या आक्रमकांनी आक्रमणही केले पण जर्मनीच्या बचावपटूंनी चांगली कामगिरी करत हे आक्रमण मोडून काढले आणि प्रतिआक्रमणाचे अनेक अयशस्वी प्रयत्न केले. पंधराव्या आणि सोळाव्या मिनिटाला जर्मनीला लागोपाठ कॉर्नर मिळाले. त्यांना त्याचे गोलमध्ये रूपांतर करता आले नाही.
उत्तरार्धाच्या सुरवातीला स्पेनने काही चांगल्या चढाया केल्या पण त्यांना गोल करण्यात यश आले नाही. ५८ व्या मिनिटाला स्पेनला पहिला गोल करणे शक्‍य होते. अलोन्सोने बॅक हिलने इनिएस्टाकडे पास दिला. त्याने तो सुंदरपणे व्हिलाकडे पास केला. पण चेंडू व्हिलाच्या अगदी जवळून गेला. त्यानंतर पेद्रोने २० यार्डावरून मारलेला फटकाही वाया गेला.
स्पेनच्या या आक्रमणाला ७३ व्या मिनिटाला यश आले. झावीने दिलेल्या कॉनरच्या फटक्‍यावर कार्ल्स पुयोलने अचूकपणे हेडरवर गोल नोंदवला. त्यावेळी चेंडू अडवण्याचे जर्मन गोलरक्षकाने केलेले प्रयत्न अपुरे पडले.
दोन वर्षांपूर्वी स्पेनने जर्मनीचाच पराभव करून युरोपीय विजेतेपद मिळविले होते. या पराभवाची परतफेड करण्यासाठी जर्मनीची क्‍लोज आणि कंपनीला अपयश आले.


 
 
About Us | Contact Us | Privacy Policy | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2010 DainikGomantak.com - All rights reserved.
of
Powered By: