तिकीट दरवाढीबाबत गोंधळ
Gomantak
Thursday, July 08, 2010 AT 07:02 PM (IST)
पणजी, ता. 7 (प्रतिनिधी) ः तिकीट दरवाढीच्या गेल्या 5 जुलै रोजी काढलेल्या आदेशामुळे अखिल गोवा बसमालक संघटना आणि वाहतूक खाते यांच्यात सुरू असलेल्या वादातील गोंधळ जास्तच वाढला आहे. सरकारने काढलेला हा आदेश बसमालकांची फसवणूक करणारा आहे. त्यामुळे प्रत्यक्षात तिकीट दर वाढण्याऐवजी ते कमी झाले आहेत, असा आरोप आज बसमालक संघटनेने पत्रकार परिषदेत केला.
या पत्रकार परिषदेला बसमालक संघटनेचे अध्यक्ष शिवदास कांबळी, सरचिटणीस सुदीप ताम्हणकर, उत्तर गोवा बसमालक संघटनेचे अध्यक्ष सुदेश कळंगुटकर, शेख फय्याज, हेमंत हळदणकर उपस्थित होते.
लांब पल्ल्याच्या बस प्रवासासाठी पहिल्या 1 ते 5 किलोमीटरला 5 रुपये व त्यापुढील प्रत्येक किलोमीटरमागे 55 पैसे आकारावेत, तर शहरातील बससेवेसाठी पहिल्या 1 ते 5 किलोमीटरला 4 रुपये व त्यापुढील प्रत्येक किलोमीटरमागे 50 पैसे तिकीट आकारण्याचा आदेश वाहतूक खात्याने जारी केला आहे. पण, हा आदेश फसवणूक करणारा आहे. त्यामध्ये तिकीट दरवाढ केलेली नाही, उलट दर कमी केले आहेत. लांब पल्ल्यासाठी पहिल्या 1 ते 3 किलोमीटरला 5 रुपये तिकीट होते. हाच दर आता पाच किलोमीटरसाठी ठेवण्यात आला आहे. शहरातील बस तिकीट 1 रुपयांनी कमी केले असून, पहिल्या 1 ते 3 किलोमीटरला 5 रुपये असलेले तिकीट 4 रुपयांवर आणले आहे. आम्ही प्रत्येक किलोमीटरमागे 20 पैसे दरवाढ मागत असताना आदेश काढून तिकीट दर कमी करण्याचा केलेला हा प्रयत्न बसमालकांना गोंधळात टाकणार आहे. त्यामुळे सरकारने हा आदेश मागे घ्यावा. याअगोदर जाहीर केलेला 12 रोजी खासगी बस सेवा बंदचा निर्णय कायम असल्याचे ताम्हणकर म्हणाले.
अनुदान देताना सतावणूक...
मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री असताना जुन्या झालेल्या बसगाड्या स्क्रॅपमध्ये काढून नवीन बसगाड्या खरेदी करण्यासाठी मिनीबससाठी 2 लाख व मोठ्या बससाठी 2.25 लाख रुपये अनुदान देण्याची योजना राबविली होती. या योजनेचा लाभ घेताना वाहतूक खात्याकडून बसमालकांची सतावणूक केली जात असून, अनुदान देण्यासाठी अधिकारी लाच मागतात. पैसे दिल्यानंतरच अनुदान मंजूर होत असल्याचा आरोप सुदेश कळंगुटकर यांनी यावेळी केला.
..............
तिकीट दर
लांब पल्ल्यासाठी...
किलोमीटर..............नवीन तिकीट............अगोदरचे तिकीट
पहिले 1 ते 5...........5 रुपये......................5 रुपये (1 ते 3 किलोमीटर)
5 कि.मी.हून पुढे.. ...प्रती कि.मी. 55 पैसे... प्रती कि.मी. 45 पैसे
शहरातील बस सेवा...
पहिले 1 ते 3..............4 रुपये.......................5 रुपये
3 कि.मी.हून पुढे.. ......प्रती कि.मी. 50 पैसे.... प्रती कि.मी. 45 पैसे