Last Update:
 
मुख्य पान

पाशेकोंना आता पोलिस कोठडीच!
Gomantak
Thursday, July 08, 2010 AT 07:32 PM (IST)
Tags: Mickky Pacheco,  
मडगाव, ता. 7 (प्रतिनिधी) ः नादिया तोरादो मृत्यू प्रकरणी गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांकडून अटक होण्याची शक्‍यता असल्यामुळे न्यायालयाला शरण आलेले माजी पर्यटनमंत्री मिकी पाशेको यांना मडगावच्या सत्र न्यायालयानेही आज जामीन नाकारला. तसेच उच्च रक्तदाब व काविळमुळे प्रकृती बिघडल्याचे कारण देऊन हॉस्पिसियो इस्पितळात दाखल झालेल्या पाशेको यांच्या पोलिस कोठडीतील चौकशीसाठी पोलिसांनी फौजदारी गुन्ह्याच्या 167 व्या कलमान्वये प्रथमश्रेणी न्यायालयाकडे अर्ज सादर करावा, असा आदेश आज अतिरिक्त सत्र न्यायाधीश प्रमोद व्ही. कामत यांनी दिला.
नादियाच्या मृत्यू प्रकरणात अनेकजण गुंतले असून, त्यात पाशेकोंचा प्रमुख्याने सहभाग असल्याचे प्रथमदर्शनी पुरावे पोलिसांकडे आले आहेत. त्यामुळे या प्रकरणाची कसून चौकशी करण्यासाठी संशयित आरोपीला पोलिस कोठडीत ठेवणे गरजेचे असल्याचे गुन्हा अन्वेषण विभागाने म्हटले आहे. या विभागाच्या तपास अधिकारी निरीक्षक सुनीता सावंत यांनी सत्र न्यायालयात तशा आशयाचा एक अर्ज सादर केला होता. हा अर्ज वैध धरण्यात येत असून, पाशेकोंच्या न्यायालयीन रिमांडची मुदत दुपारी 3.30 वाजता संपली असल्याने इस्पितळातून "डिस्चार्ज' मिळताच त्यांना पोलिस कोठडीत ठेवण्यास पोलिस मुक्त असल्याचे न्यायाधीशांनी आदेशात नमूद केले आहे.
हॉस्पिसियो इस्पितळाच्या डॉ. आयोना बार्रेटो यांनी संशयिताच्या प्रकृतीबाबत दिलेल्या अहवालानुसार त्यांच्या आजाराचे गांभीर्य तेवढे दिसून येत नाही. तसेच इस्पितळाच्या डॉक्‍टरांनी दिलेल्या अहवालात खाडाखोड केलेली असून, तारीखही नमूद केलेली नाही. त्यामुळे न्यायालय या वैद्यकीय अहवालानुसार संशयिताच्या आजाराचे गांभीर्य ग्राह्य धरू शकत नाही. वैद्यकीय अहवाल विसंगत आहे. नादियाच्या मृत्यू प्रकरणामागील सत्य शोधून काढण्यासाठी संशयिताची पोलिस कोठडीतील चौकशी गरजेची आहे. अशा परिस्थितीत त्यांना जामीन मंजूर करणे शक्‍य नाही. संशयिताचा जामीन अर्ज फेटाळण्यात येत आहे, असे न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे. सरकारी पक्षातर्फे ऍड. सरोजिनी सार्दिन व प्रतिवादीतर्फे ऍड. सुरेंद्र देसाई यांनी युक्तिवाद केला.
---------
मिकी समर्थकांचे शक्तिप्रदर्शन सुरूच
पाशेको यांच्या जामीन अर्जावरील युक्तिवाद काल पूर्ण झाले होते व त्यावरील निवाडा आज देणार असल्याचे काल जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे त्यांच्या समर्थकांनी आज न्यायालयाच्या बाहेर प्रचंड गर्दी केली होती. पोलिसांनी त्यांना न्यायालयाच्या बाहेर अडवून ठेवले होते. न्यायाधीशांनी जामीन फेटाळल्याचे कळताच त्यांनी सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या. नादियाच्या मृत्यू प्रकरणात पाशेको यांचा हात नसून कॉंग्रेस आघाडीच्या विधिमंडळातील कांही मंत्री त्यांना या मृत्यू प्रकरणात गुंतविण्याचा प्रयत्न करीत असल्याच्या घोषणा त्यांनी दिल्या.



 
 
About Us | Contact Us | Privacy Policy | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2010 DainikGomantak.com - All rights reserved.
of
Powered By: