Last Update:
 
क्रीडा

चीन, अमेरिकेतही क्रिकेट वाढवणार
Gomantak
Thursday, July 08, 2010 AT 06:54 PM (IST)
मुंबई, ता. ७ ः क्रिकेट हा खेळ जगातील १०४ देशांत खेळला जात आहे. त्याची व्याप्ती वाढत असताना अमेरिका आणि चीन या दोन महासत्तांमध्ये तो प्रसिद्ध करण्यासाठी आणि त्याची पाळेमुळे रुजविण्यासाठी "आयसीसी' येत्या काळात प्रयत्न करणार आहे, अशी ग्वाही "आयसीसी'चे नवे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या सत्कार सोहळ्यात दिली. तसेच ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान यांना उपाध्यक्षपद मिळाले नसले तरी "आयसीसी'मध्ये कोणताही वांशिक द्वेष नाही, असेही पवार यांनी स्पष्ट केले.
राज्याचे उपमुख्यमंत्री छगन भुजबळ कुटुंबीयांतर्फे शरद पवार यांचा "आयसीसी'चे अध्यक्ष झाल्याबद्दल आज मुंबईत राज्यपाल के. शंकर नारायणन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या सोहळ्यास राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसह माजी कसोटीपटू उपस्थित होते. सत्काराचा हा कार्यक्रम छोटेखानी असला तरी त्याची भव्यता मात्र व्यापक होती. विश्‍व क्रिकेटचे पालकत्व असलेल्या "आयसीसी'च्या प्रमुखपदी एक भारतीय व्यक्ती असल्याचा अभिमान सर्वांच्या नजरेतून जाणवत होता. २००१ मध्ये मुंबई क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आता "आयसीसी'च्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यापर्यंतच्या श्री. पवार यांच्या क्रिकेटमधील या वाटचालीचा आढावा हर्षा भोगले यांनी प्रास्ताविकात घेतला आणि तेथूनच संपूर्ण वातावरण क्रिकेटमय झाले. माजी कसोटी कर्णधार अजित वाडेकर, दिलीप वेंगसरकर यांच्यासह माजी क्रिकेटपटू आणि राष्ट्रवादीचे नेते पवार यांचे अभिनंदन करीत होते.
क्रिकेट हा खेळ खऱ्या अर्थाने जागतिक कसा होईल याकडे आपला भर असेल आणि त्यासाठी चीन व अमेरिका अशा देशांत त्याची वृद्धी करण्यात येईल, असे सांगून पवार म्हणाले, ""चीनमध्ये क्रिकेट रुजू लागला आहे. शालेय स्पर्धांत क्रिकेट खेळले जात आहे, त्यांच्या आताच्या पिढीला क्रिकेट हवे आहे आणि हा धागा पकडून आम्ही चीनमध्ये क्रिकेट हा खेळ रुजवू. अमेरिकेच्या काही भागांत क्रिकेट लोकप्रिय होत आहे, तेथे स्टेडियम नाहीत, त्यांच्या सरकारकडून मदत मिळाली आणि स्टेडियम व मैदाने तयार झाली, तर तेथेही क्रिकेटची वाढ होण्यास वेळ लागणार नाही.''

कसोटी क्रिकेट वाचवणारच
सध्या टी-२० चा जमाना आहे. ज्यांच्याकडे वेळ नसतो, त्यांना हा प्रकार आवडतो; परंतु टी-२० च्या वाढत्या लोकप्रियतेतही कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट वाचविण्याचा "आयसीसी' प्रयत्न करील, असे सांगतानाच पवार यांनी, आपल्याला कसोटी क्रिकेट आवडत असल्याचे आवर्जून सांगितले.

पुढील वर्ष महत्त्वाचे
पुढील वर्षी भारतीय उपखंडात विश्‍वकरंडक स्पर्धा होत आहे. आपल्या दृष्टीने ही स्पर्धा सर्वांत महत्त्वाची आहे. श्रीलंका आणि बांगलादेशमध्येही सामने होणार असले तरी सर्वाधिक सामने भारतात होणार आहेत. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे पवार यांनी सांगितले.

"आयसीसी' वर्णद्वेषी नाही
ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान जॉन हॉवर्ड यांना उपाध्यक्ष पद न मिळाल्यामुळे उगाचच अवडंबर माजवण्यात आले. विनाकारण वांशिक भेद उपस्थित करण्यात आला. मी स्वतः हॉवर्ड यांच्या उमेदवारीसाठी उत्सुक होतो; परंतु इतर राष्ट्रांनी त्यांना पाठिंबा दिला नाही. याचा अर्थ "आयसीसी'मध्ये वांशिक मतभेद केला जातो, असे नाही. असे असते, तर माझ्याअगोदरचे मॉर्गन हे अध्यक्षपदी कसे निवडून आले असते, असा सवालही पवार यांनी उपस्थित केला.

अशीच मदत करा....
श्री. पवार यांनी आपल्या मोजक्‍या आणि छोटेखानी भाषणात मीडियाला चांगलीच कोपरखळी दिली. गेल्या काही दिवसांपासून माझ्या "जबाबदारी'बाबत बरेच काही लिहिले जात आहे. काहीही न करता मला चांगलीच प्रसिद्धी मिळत आहे; परंतु अशी प्रसिद्धी करताना माझे मत विचारात घेतले, तर बरे होईल, असे हसत हसत सांगत पवारांनी अशी मोफत प्रसिद्धी मला पुढील दोन वर्षांत लागणार आहे, तेव्हा ती द्या, असे मत व्यक्त केले, तेव्हा सभागृहात खसखस पिकली.


 
 
About Us | Contact Us | Privacy Policy | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2010 DainikGomantak.com - All rights reserved.
of
Powered By: