गोवा विद्यापीठाचा दीक्षान्त समारंभ
प्रतिनिधी
Friday, January 27, 2012 AT 09:24 PM (IST)
पणजी, ता. 27 : उच्च शिक्षणाच्या पद्धतीत मोठा बदल होण्याची गरज आहे. सध्याच्या माहितीवर आधारित शिक्षण प्रणालीपेक्षा विश्लेषणात्मक क्षमता व कल्पकतेला चालना देणारी पद्धत अवलंबिल्यास ती अधिक परिणामकारक व "फेसबुक'चा वापर करणाऱ्या पिढीला आकर्षक वाटेल, असे प्रतिपादन वैज्ञानिक आणि औद्योगिक अनुसंधान परिषदेचे महानिर्देशक प्रा. समीर के. ब्रह्मचारी यांनी आज केले.
गोवा विद्यापीठाचा 24वा दीक्षान्त समारंभ आज सकाळी विद्यापीठाच्या ज्युबिली सभागृहात पार पडला. वैज्ञानिक आणि औद्योगिक अनुसंधान परिषदेचे महानिर्देशक प्रा. समीर के. ब्रह्मचारी यांचे यावेळी अभिभाषण झाले. गोवा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप देवबागकर, कुलसचिव डॉ. विजयेंद्र कामत, शिक्षकवर्ग व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. राज्यपाल व कुलपती के. शंकरनारायणन यांच्या अनुपस्थितीत कुलसचिव विजयेंद्र कामत यांनी राज्यपालांच्या अध्यक्षीय भाषणाचे वाचन केले. अभिभाषणापूर्वी डॉक्टरेट पदव्यांबरोबर विविध शाखांमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या विद्यार्थ्यांना पदके तथा बक्षिसे प्रदान करण्यात आली.
प्रा. ब्रह्मचारी म्हणाले, "नवनवीन शिक्षण पद्धती तथा तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याची क्षमता शिक्षण पद्धतीत असायला हवी. आजचा विद्यार्थी हा माहिती अथवा ज्ञानासाठी पुस्तके तथा ग्रंथालयांवर अवलंबून नाही. विद्यार्थी, मित्र तथा माहिती त्याला फेसबुकव्दारे मिळते. फेसबुकला सामावून घेण्याची लवचिकता आजच्या शिक्षण पद्धतीत असायला हवी. संगणकाचा माऊस हलविला की विद्यार्थ्याला पाहिजे ती माहिती मिळू शकते. यासाठी पाठांतराची फारशी गरज नाही.
विद्यार्थ्यांच्याच खांद्यावर देशाची जबाबदारी विद्यार्थी हाच खरा देशाचा चेहरा आहे. विद्यार्थ्यांच्याच खांद्यावर देशाचे भवितव्य आहे. जगातील बरेच लोक उपाशी झोपतात. बऱ्याच जणांकडे औषधांसाठी पैसे नसतात. तुम्हाला जशी देशाची गरज आहे अगदी तशीच तीन अब्ज लोकांना तुमची नितांत गरज आहे. या दिशेने तुमची वाटचाल व्हायला हवी. यासाठी तुम्हाला शुभेच्छा', असे प्रा. ब्रह्मचारी म्हणाले.
समाजशास्त्र व संस्कृतीचा अभ्यास करण्याचे गोवा विद्यापीठ उत्कृष्ट स्थळ : राज्यपाल कुलपती तथा राज्यपाल के. शंकरनारायणन यांचे लिखित स्वरूपाच्या भाषणाचे वाचन कुलसचिव डॉ. विजयेंद्र कामत यांनी केले. ते म्हणाले, "राज्याची अर्थव्यवस्था, समाजकारण व संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी गोवा विद्यापीठासारखे उत्कृष्ट स्थळ दुसरे कोणतेही नाही. यातच पुन्हा विद्यापीठात नवनवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहेत. पायाभूत सुविधांमध्येही सुधारणा करण्यात येत आहेत. नवनवीन संशोधन करणारे विद्यापीठ अशी भविष्यात गोवा विद्यापीठाची ओळख होणे शक्य आहे'.
देशात शिक्षकवर्गाची कमतरता : डॉ. देवबागकर कुलगुरू डॉ. दिलीप देवबागकर म्हणाले, "देशात पात्र व तज्ज्ञ शिक्षकवर्गाची कमतरता आहे. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनीही एकदा या बाबीचा उल्लेख केला होता. शिक्षकवर्गाची कमतरता असूनही गोवा विद्यापीठाने चांगली कामगिरी बजावलेली आहे. देशाच्या मानांकनात गोवा विद्यापीठ 19व्या स्थानावर आहे. ही कामगिरी उल्लेखनीय आहे'.
गोवा विद्यापीठातून...
- 54 विद्यार्थ्यांना डॉक्टरेट, तर 994 विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी
- 7198 विद्यार्थ्यांना पदवी
- 62 विद्यार्थ्यांना पदके, 30 जणांना बक्षिसे, 16 जणांना शिष्यवृत्त्या
- अभिनेत्री प्रियांका बिडये हिला रसायनशास्त्रात डॉक्टरेट
- मंत्री ज्योकिम आलेमाव यांची कन्या रैसा हिला एम. ए. (राजशास्त्र) विषयात डॉ. दुभाषी पुरस्कार
|
|
|