Last Update:
 
मुख्य पान

पाळोळे किनाऱ्यावरील दुकानांना आग - 15 लाखांचे नुकसान
प्रतिनिधी
Saturday, January 28, 2012 AT 03:15 AM (IST)
Tags: goa,   kankon,   palole,   fire
काणकोण, ता. 27 ः जगाच्या पर्यटन नकाशावर असलेली पाळोळे किनारपट्टी हळू हळू मानवनिर्मित आपत्तीच्या दिशेने सरकत आहे. त्याची चाहूल बुधवारी (ता. 25) घडलेल्या आगीच्या दुर्घटनेने लागली आहे. या आगीत तीन कपड्यांची व वाद्यांची दुकाने जळून खाक झाली. अग्निशामक दलाच्या माहितीप्रमाणे या आगीत 15 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र, दुकानदारांनी या आगीत 50 लाखांपेक्षा जास्त किमतीचा माल जळाल्याचा दावा केला आहे. आग विझविण्यासाठी सावर्डे, कुंकळ्ळी मडगाव येथून अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. तरीही पहाटे 2 वाजेपर्यंत आग आटोक्‍यात येत नाही हे पाहून खासगी टॅंकरने पाण्याचा पुरवठा करण्यात आला. या आगीत वल्लू ईश्वर नायक, पप्पू छत्रीय कारभारी (कर्नाटक), अजय कांजा (गुजरात) यांची कपड्यांची दुकाने व हमीद शेख ढोलकीवाला (कर्नाटक) यांचे वाद्यांचे दुकान या आगीत जळाले.

आग विझविण्याची साधने नव्हती
किनारी हंगामी दुकानांत आग विझविण्याचे "फायर एक्‍सटिगुशर' हे यंत्र ठेवणे गरजेचे आहे. मात्र, या आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या एकाही दुकानात ही यंत्रणा नव्हती. पालिकेने दुकानांना परवानगी देताना या गोष्टी पाहणे गरजेचे असल्याचे मत अग्निशामक दलाचे काणकोण केंद्र प्रमुख काशिनाथ आमोणकर यांनी व्यक्त केले.

दुकानाची परवानगी स्थानिकांना
पालिकेने या ठिकाणी दुकाने थाटण्यात स्थानिकांना परवानगी दिली आहे. मात्र, त्यांच्या नावावर परगावचे व्यावसायिक येथे अनधिकृतपणे व्यवसाय करीत आहेत. हे सत्य या घटनेने उघड झाले आहे.
लाखो रुपये भाडेतत्त्वावर ही दुकाने चालविण्यास देण्यात येतात. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. मात्र, हे परगावचे व्यावसायिक दुकानांचा स्वयंपाक व निवासासाठी वापर करतात. त्यामुळे स्वयंपाक करतानाही ही आग लागण्याची शक्‍यता येथे व्यक्त करण्यात येते.

पाच वर्षांत तिसरी घटना
गेल्या पाच वर्षांत पाळोळेत दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी पडण्याची ही तिसरी घटना आहे. बुधवारच्या घटनेत ज्या व्यावसायिकाला फटका बसला आहे. त्याचेच दुकान पाच वर्षांपूर्वी आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते. गेल्यावर्षी याच भागात दोन दुकाने आगीत जळून खाक झाली होती. काही व्यावसायिकांनी दिलेल्या माहितीप्रमाणे आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या एका महिला व्यावसायिकाची लाखो रुपयांची पुंजी दुकानातच होती. ती पुंजीही या आगीत जळून गेली आहे.

आगीस व्यावसायिकच जबाबदार
पाळोळे येथील दुकानात आग लागण्यास येथील व्यावसायिक जबाबदार आहेत. या व्यावसायिकांनी एकच वीज जोडणी घेऊन चार दुकानांना वीजपुरवठा केला होता. पाळोळे येथील काही परगावचे व्यावसायिक हाच प्रकार करीत आहेत. यापूर्वी हे धोकादायक असल्याचे वीज खात्याच्या स्थानिक अभियंत्यांच्या निदर्शनास आणून दिले होते, असे नगराध्यक्ष रमाकांत नाईक गावकर यांनी सांगितले. पाळोळे येथे काही दुकाने पालिकेच्या वाहनतळाच्या जागेत आहेत. त्यांच्याविरुद्ध कारवाई करणे गरजेचे आहे. सोमवारी मुख्याधिकारी प्रदीप नाईक यांनी कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे, असे नगराध्यक्ष नाईक गावकर यांनी माहिती देताना सांगितले.



 
 
About Us | Contact Us | Privacy Policy | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2011 DainikGomantak.com - All rights reserved.
of
Powered By: