केपे, ता. 27 ः केपे मतदारसंघाचे आमदार या नात्याने लोकांच्या सेवेला वाहून घेताना लोकांच्या ज्या गरजा व मागण्या होत्या त्या पूर्ण करण्याचे आटोकाट प्रयत्न केले असून निवडणुकीवेळी जी जी आश्वासने आपण दिली होती ती आपण पूर्ण केल्याचे केपे मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत ऊर्फ बाबू कवळेकर यांनी सांगितले. या मतदारसंघातील अति दुर्गम अशा बार्शे, मोरपिर्ला, बेतूल, कावरे-पिर्ला, फातर्पा या पंचायत क्षेत्रात वीज व पाणी पुरवठ्याची सोय कोली.
या मतदारसंघाचा अधिकतर भाग डोंगराळ व दुर्गम असल्याकारणाने मोरपिर्ला, बेतूल, फातर्पा व बाळ्ळी या पंचायत क्षेत्रात सुमारे 5.50 कोटी रुपये खर्चून आंबावली ते बाळ्ळी अशी स्वतंत्र जलवाहिनी घालण्यात आली. कावरे-पिर्ला पंचायत क्षेत्रातील अति उंच अशा कर्ला, काजुगठ्ठो, मानगाळ डोंगराळ भागात विजेची सोय करण्यात आली तसेच दुर्गम भागात रस्त्यांचेही काम करण्यात आले.
केपे मतदारसंघात सुमारे 37 बंधारे बांधण्यात आले असून त्यामुळे या परिसरातील पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. या प्रत्येक बंधाऱ्यासाठी 40 ते 60 लाख रुपये खर्च आला. बोरीमळ येथे सर्व आधुनिक सोयींनी युक्त असा बहुउद्देशीय क्रीडा प्रकल्प उभारण्यात आला.
बोरीमळ व बाळ्ळी येथील इस्पितळाची उभारणी करण्यात आली. केपे येथे एक परिपूर्ण असे इस्पितळाची गरज होती. बोरीमळ येथील आरोग्य केंद्र अपुरे पडत होते. आणीबाणीच्या वेळी लोकांना कुडचडे अथवा मडगाव न्यावे लागत असे. कुडचडे येथे पूर्ण दर्जाचे आरोग्य केंद्र असल्याने ही मागणी पूर्ण होणे अशक्य होती. आज या जागी तीस खाटांची सोय असणारे पूर्ण दर्जाचे इस्पितळ उभे होत असून त्याचे काम जवळ-जवळ पूर्ण झाले आहे. त्याचप्रमाणे बाळ्ळी येथेही आरोग्य केंद्राच्या दर्जात वाढ करण्यात आली असून तेथेही तीस खाटांची सोय करण्यात आली आहे.
ताक ते पाडादेग-शिरवई असा खनिज वाहतुकीसाठी 17 किलो मीटर अंतराचा बायपास रस्ता बांधण्यासाठी सुमारे 28 कोटी रुपये खर्च येणार असून वन खात्याने रस्त्यासाठी काही भाग संपादन करण्यासाठी हरकत घेतल्यामुळे हे काम ठप्प झाले आहे. हा रस्ता झाल्यानंतर केपे परिसरातील लोकांची डोकेदुखी दूर होणार आहे.
या प्रकल्पा व्यतिरिक्त केपे कुशावती नदीवरील पुलाला समांतर पूल बांधण्याचे काम सध्या प्रगतिपथावर असून हा पूल पूर्ण झाल्यावर केपे बाजारातील वाहतुकीची कोंडी कायमची निकालात निघणार आहे.
केपे पालिका क्षेत्रातील कचऱ्याची समस्या सोडविण्यासाठी कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी निधी उपलब्ध झाला आहे. या प्रकल्पाची क्षमता पाचावरून दहा मेट्रिक टन वाढविण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पालिकेच्या जीर्ण झालेल्या प्रशासकीय इमारतीच्या जागी नवीन इमारत उभारण्यासाठीही शासनामार्फत निधीची तरतूद करून दिली आहे. केपे पालिका उद्यानाचे एक कोटी 7 लाख रुपये खर्चून सौदर्यीकरण करण्यात आले.
काराळी-केपे येथे सहा कोटी रुपये खर्चून बसस्थानक व केपे येथे 4.50 कोटी रुपये खर्चून मासळी मार्केट प्रकल्पाचा पहिल्या टप्प्यातील बांधकाम पूर्ण करण्यात येणार आहे. या दोन्ही प्रकल्पांना आर्थिक संमती घेण्यात आली असून फक्त निविदा येण्याची बाकी असल्याचे आमदार कवळेकर यांनी सांगितले.
बेतूल व आसपासच्या परिसरातील पाण्याची समस्या सोडविण्यासाठी साळावली ते बेतूल अशी तेट 17 कोटी रुपये खर्चून जलवाहिनी घालण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच बार्से पंचायत क्षेत्रातील पाण्याची समस्या सोडविण्यासाठी सुमारे आट कोटी रुपये खर्चून नयाबांद ते बार्से अशी जलवाहिनी घालण्यात येणार आहे. ही जलवाहिनी खड्डे, बेंदुर्डे, बासरय, तेलाय, काजूवाडा भागातून जाणार आहे.